बहुचर्चित लोकसभा उमेदवार कन्हैया कुमार यांच्या उत्पन्नाची साधने…

Credit – twitter / KanhaiyaKumar

देशभरात लोकसभा निवणुकींचे वारे जोरात वाहतायेत. राजकीय मैदानात संविधानास सर्वोच्च स्थानी ठेऊन लढवली जाणारी निवडणूक भारतीय लोकशाहीत सामान्य जनतेला मतदानाचा उच्चतम अधिकार देते. देशभरातून अनेक उमेदवार आपल्या लढवय्या वृत्तीसह निवडून चिन्हांची ढाल घेऊन जनतेच्या सेवेस मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्या असून काही इतर ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. २०१४ ला झालेल्या बहुचर्चित मोदी लाटेनंतरची होणारी ही निवडणूक रोमांचपूर्ण असणार आहे यात तिळमात्रही शंका नाही. अश्यातच यावर्षी देशभरातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये कन्हैया कुमार यांच नाव प्रकर्षाने प्रसिध्दी माध्यमातुन झळकताना दिसतंय…

बिहारमधील बेगूसराई जिल्हाचा मूळ रहिवासी असलेला कन्हैया जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष असून त्याचा बिहार ते दिल्ली हा प्रवास अतिशय खडतर आहे. आपल्या पीएचडी दरम्यान कन्हैया सोबत काही विद्यार्थ्यांवर एका कार्यक्रमात सहभागी होऊन कताकथित देशविरोधी नारेबाजी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. तिहाड तुरूंगातून बाहेर पडल्यावर जे.इन.यु मध्ये स्थित फ्रीडम स्वेअरला केलेल्या आपल्या भाषणातून कन्हैया घरोघरी पोहोचला. सरकारी दमनशाही विरोधात लढणाऱ्यांसाठी कन्हैया नायक बनला, स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करत असतानाच्या प्रवासातून कन्हैया एक युवा नेतृत्व म्हणून उदयास आला आहे. विद्यार्थी नेता ते लोकनेता या प्रवासात कन्हैयाबद्द्ल समाजवर्गाकडून सकारात्मक व नकारात्मक दोन्ही पारडे नेहमीच सतर्क असतात….

बेरोजगार कन्हैया ?

लोकसभा निवडणूकीसाठी सादर करण्यात आलेल्या आपल्या शपथपत्रात कन्हैयाने त्याचे दोन वर्षाचे उत्पन्न ८.५० लक्ष रुपये इतके दर्शविले असून स्वतःची बेरोजगार म्हणून नोंद केली आहे. सध्या कन्हैयाकडे स्थायी किंवा अस्थायी स्वरूपाची कोणतीही नोकरी नाही. मागील वर्षी जुलै महिन्यात कन्हैयाने आपला शोधनिबंध विद्यापीठाकडे सुपूर्द केला होता. विद्यापीठाकडून फेब्रुवारी २०१९ मध्येच कन्हैयाला पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

ही आहेत उत्पन्नाची साधने…

शपथपत्रातील माहितीनुसार (PDF) कन्हैयाचे २०१७-१८ व २०१८-१९ सालाचे वार्षिक उत्पन्न ६,३०,३६० व २,२८,२९० इतके आहे. विमा योजनेचे १,७०,१५० तसेच १,६३,६४८ रुपये बचत खात्यात जमा असल्याची नोंद केली आहे. त्याव्यतिरिक्त २४,००० रोख रक्कम सोबत २.५ लक्ष रुपये किमतीची वडिलोपार्जित जमीनीची नोंद देखील शपथपत्रात दिसून येते.

कन्हैयाच्या ‘बिहार ते तिहार’ या पुस्तकातुन आलेल्या रॉयल्टीचा त्याच्या मागील २ वर्षाच्या उत्पन्नात सर्वाधिक वाटा आहे. मूळ हिंदी भाषेमध्ये लिहिलं गेलेलं जगरनॉट बुक्स प्रकाशनाचे हे पुस्तक कन्हैयाच्या जीवनप्रवासावर असून त्याचे मराठी, इंग्रजी, पंजाबी, मल्याळम, तमिळ, कन्नड, तेलगू, बंगाली अश्या आठ भाषांमध्ये भाषांतर झाले. त्याच बरोबर मुक्त लेखन, गेस्ट लेक्चर या माध्यमातून मिळालेले मानधन याचा देखील उल्लेख शपथपत्रात आढळतो.

कन्हैयाने आपले २ वर्षांचे उत्पन्न एकूण ८.५० लक्ष इतके जाहीर केले आहे. नेटकरी विशेषतः ट्रोल्स कडून कन्हैयाच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. परंतु कन्हैयाच्या पुस्तकाचा खप, त्याला विविध लिट-फेस्ट, सांस्कृतिक कार्यक्रमांचे निमंत्रण, माध्यमांच्या चर्चा यातून मिळणारे मानधन विचारात घेता उत्पन्नावर उपस्थित प्रश्न बिनबुडाचे वाटतात.

कन्हैया भुकेच्या प्रश्नावर बोलतो, तो बेरोजगारी वर बोलतो, तो देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाच्या समस्येवर बोलतो, त्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करतो. वर्गविरहित जातविरहित समाजनिर्मितीबद्दल बोलतो, तो देशातल्या प्रत्येक घटकाच्या मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याच्या उपाययोजनांवर बोलतो…देशाच्या व्यवस्थेला प्रश्न विचारतो तो सविधानाला सर्वोच्च मानतो…म्हणून तो माणसातली माणुसकी दर्शविणारा माणूस आहे. कन्हैया भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, शाहू, फुले, आंबेडकर, बिरसा व सावित्री यांना मानतो. तो जे बोलतो ते करतो.

निवडणूक लढवताना प्रस्तापित नेत्यांकडून होणारी भाषणबाजी आपण दर पाच वर्षांनी ऐकत असतो परंतु बोले तैसा चाले या म्हणीप्रमाणे चालणारे रणधुमान नेते सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर फार कमी पाहायला मिळतात त्यातला एक कन्हैया आहे. कन्हैयाने हे वेळोवेळी सिद्ध केले आहे. कन्हैयाने उमेदवारी अर्जात जातीच्या ठिकाणी जागा रिकामी सोडून तो जे बोलतो तेच वागतो हे सिद्ध केले आहे. हे जातविरहित मानव समाज निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

एकंदरीत राजकीय रणधुमीत उधळणाऱ्या बेभान तुफान चर्चांबद्दल कन्हैयाच्या लोकसभा निवडणुकीचे प्रचार प्रमुख व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन चे माजी महासचिव कॉम्रेड विश्वजित कुमार यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले
“आम्ही सत्याशी बांधील आहोत, सत्य लपत नाही आणि आज ते जनतेसमोर आहे. ज्या कन्हैयाला दिल्लीत (त्याच्या सुरुवातीच्या काळात) २ वेळच्या जेवणासाठी देखील संघर्ष करावा लागला आज तो मोदींजींच्या दडपशाहीने नेता बनला आहे आणि देशातील जनतेने त्याला व त्याच्या परिवाराला आर्थिक मदतही केली आहे”

कन्हैया भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर ही निवडणूक लढणार असून त्याला निवडणूक लढवण्याकरता सामान्य जनतेनी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून ५ हजाराहून अधिक देणगीदारांनी एकूण ७० लक्ष रुपये मदत केली आहे. त्यातील सुमारे १४०० देणगीदारांनी प्रत्येकी रुपये १०० देणगी देऊन क्राऊड फंडींगचे लक्ष गाठण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. कन्हैयाच्या नॉमीनेशन रॅलीत लाखोंच्या पटीने लोक उपस्थित होते, देशविदेशातुन लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या कन्हैया सोबत वेगवेगळ्या मार्गानी जुळलेले आहेत. भारतीय लोकशाही फासीवादी शक्तींच्या निशाण्यावर असताना कन्हैया सारखा युवानेता देशातील सामान्य जनतेसाठी निश्चितच अपेक्षापूर्तीची खाण आहे असे म्हणायला हरकत नाही