ए.आय.एस.एफ च्या २९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AISF 29th National Conference Inaugural session

अनंतरपूर :

शहीद भगत सिंग यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (एआयएसएफ) चे २९ वे राष्ट्रीय अधिवेशन दि.२७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर अनंतरपूर, आंध्रप्रदेश येथे उत्साहात पार पडले. यापूर्वी २०१३ साली उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद येथे २८ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. संघटनेत नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिवेशनाद्वारे कृतीकार्यक्रम देण्यात येत असतात. बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भूतकाळात घेतलेले निर्णय, भूमिकांवर पुनर्विचार करून आवश्यक त्या फेरबदलाचा वाव या निमित्ताने मिळतो, या प्रक्रियेत देशभरातून आलेले प्रतिनिधी सहभागी होतात आणि एकत्रित पणे आपल्या अनुभवांच्या शिदोरीने संघटनेच्या ध्येय धोरणांना दिशा देण्याचे काम करतात, यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील २२ प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी झाले होते.

२९ वे राष्ट्रीय अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

यंदाच्या एकोणतीसाव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन दि.२७ सप्टें रोजी Save & Strengthen Public Sector Education असा नारा देत एका विशाल रॅलीने करण्यात आले, रॅलीत साधारणपणे १५ हजार विद्यार्थी युवकांचा समावेश होता. साईबाबा कॉलेज पासून निघालेल्या रॅलीचे रूपांतर आर्टस् कॉलेज समोर महासभेत करण्यात आले, याप्रसंगी जे.इन.यु विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष कॉम्रेड कन्हैया कुमार, गुजरातचे अपक्ष आमदार साथी जिग्नेश मेवानी, फातिमा नफिज ( जे.इन.यु मधील लापत्ता विद्यार्थी नजीब च्या आई) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड वली उल्लाह कादरी, महासचिव कॉम्रेड विश्वजित कुमार, राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड पंकज चव्हाण, नॅशनल गर्ल्स कन्व्हेनर कॉम्रेड करमवीर कौर, खजिनदार विकी माहेश्वरी, संघटनेचे इतर सचिव मंडळ सदस्य, भाकप राज्यसचिव तथा माजी आमदार कॉम्रेड के.रामकृष्णा, आदी मान्यवरांनी संबोधित केले.

Former JNUSU President and AISF Leader Comrade Kanhaiya Kumar addressing the public meeting.

२९ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या डेलिगेट सेशनचे आयोजन आंबेडकर भवन येथे शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे सभागृहात करण्यात आले होते तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वाराचे नामकरण कॉम्रेड ए. बी. बर्धन व रोहीत वेमुलाच्या नावे करण्यात आले होते. दि.२८ सप्टें रोजी फ्लॅग होस्टिंग द्वारे अधिकृत रित्या अधिवेशनाला सुरुवात झाली, उद्घाटन सत्रात राज्यसभेचे खासदार कॉम्रेड विनय विश्वम यांनी सभागृहातील देशभरातुन आलेल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला, देशातील अघोषित आणीबाणी सारख्या वातावरणात एआयएसएफ च्या २९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे महत्व यांनी अधोरेखित केले, एआयएसएफ चे माजी नेते तथा मा.आमदार कॉम्रेड के.रामकृष्णा यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या. तसेच अनंतपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि एआयएसएफ च्या माजी नेत्या एम. स्वरूपा उद्घाटन सत्राला उपस्थित होत्या.

महासचिव कॉम्रेड विश्वजित कुमार यांनी संघटनात्मक कार्याचा अहवाल मांडला, देशभरातील सक्रीय असलेल्या तब्बल २५ राज्य केंद्रांच्या कामाचा अहवाल सभागृहासमोर याप्रसंगी सादर करण्यात आला. प्रत्येक राज्यातील सचिवांनी अहवालावर आपले मत मांडले तसेच अहवालातील त्रुटी भरून काढण्यासाठी सूचना मांडल्या, महाराष्ट्राचे सचिव कॉम्रेड सागर दुर्योधन यांनी राज्यकेंद्राकडून हाताळण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुणे ते मुंबई लॉंग मार्च आणि पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती व वसतिगृह हक्क परिषदेविषयी सभागृहात माहिती दिली. आजवर कन्हैया कुमार यांच्या सर्वाधिक सभांचे आयोजन हे महाराष्ट्रात करण्यात आलेले असून कन्हैयाच्या निमित्ताने नव्या जिल्ह्यांमध्ये संघटना बांधणीला मदत होऊन मुंबई, पुणे, नागपूर तसेच नाशिक या शहतील शाखा बऱ्याच कालावधी नंतर सक्रिय झाल्याचे महासचिव विश्वजित कुमार यांनी सांगितले.

महासचिव कॉम्रेड विश्वजित कुमार यांनी संघटनेचा Political Draft Report सभागृहासमोर सादर केला, त्यावर विवीध राज्यातील प्रतिनिधींनी आपले मत मांडले.

दुपारच्या सत्रात जेष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी यांचे Communal Treat या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते, सभागृहातुन व्याख्यानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

संध्याकाळी शहीद भगत सिंग यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

२९ सप्टेंबर रोजी पहिल्या सत्रात AIFUCTO या देशव्यापी प्राध्यापकांच्या संघटनेचे महासचिव प्रा.अरुण कुमार यांनी Commercialization, Communalization of Education and Challenges या विषयावर विद्यार्थी प्रतिनिधींसोबत संवाद साधला, वर्तमान परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या तसेच प्राध्यापकांच्या संघटनांनी एकत्रित रित्या, समन्वय साधून काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी सभागृहाने ‘Teachers Students Unity Long Live’ अश्या घोषणांद्वारे प्रा.कुमार यांच्या वक्तव्याचे स्वागत केले.

त्यानंतर अखिल भारतीय शिक्षण अधिकार मंचाचे (AIF-RTE) प्रेसिडियन मेंबर, Centre for Human Rights – University of Hyderabad येथे कार्यरत प्रा. हरगोपाल यांनी शैक्षणिक क्षेत्रातील नव्या आवाहनांवर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

दुपारच्या सत्रात कॉम्रेड विश्वजित कुमार, कॉम्रेड पंकज चव्हाण, कॉम्रेड करमवीर कौर यांच्या नेतृत्वाखाली Organisational, Political आणि कॉम्रेड विकी माहेश्वरी, कॉम्रेड मोहसीन मोहम्मद यांच्या नेतृत्वाखाली Educational Commission नेमण्यात आले, आपल्या प्राथमिकतेनुसार देशभरातील प्रतिनिधी आपल्या कमिशन मधील चर्चेत सहभागी झालेत.

दि.३० सप्टेंबर रोजी पहिल्या सत्रात कमिशन रिपोर्टचे सादरीकरण करण्यात आले, त्याच बरोबर Credential Committee चा अहवाल सादर करण्यात आला, त्यानुसार देशभरातुन विविध ज्ञान शाखेतील ५७२ डेलिगेट यावेळी अधिवेशनात सहभागी असल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात आले उदा.वाढीव शिष्यवृत्ती व मागेल त्याला वसतिगृह, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी विद्यार्थी चळवळी अधिक तीव्र करणे, सोशल मीडियावर संघटनात्मक बाबी उघड करून टीका टिपण्णी करणाऱ्यांवर अनुशासनात्मक कारवाई केली जाईल अश्या अनेक प्रकारचे ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले.

त्यासोबतच ८५ सदस्य संख्या असलेल्या नव्या राष्ट्रीय कौन्सिलची निवड करण्यात आली त्यात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कॉम्रेड शुवम बॅनर्जी (प. बंगाल), महासचिव म्हणून कॉम्रेड विकी माहेश्वरी (पंजाब), राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी कॉम्रेड पंकज चव्हाण (महाराष्ट्र), कॉम्रेड शिवराम कृष्णा (तेलंगणा), कॉम्रेड सुवेश सुभाकर (केरळ) यांची निवड करण्यात आली तसेच राष्ट्रीय सचिव म्हणून कॉम्रेड सुशील कुमार (बिहार), कॉम्रेड दिनेश (तामिळनाडू), कॉम्रेड के.जी.रंगणा (आंध्रप्रदेश) तर राष्ट्रीय कोषाध्यक्ष पदी कॉम्रेड मानस बोरा (आसाम) यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

Maharashtra delegates for 29th National Conference of AISF along with Comrade Pankaj Chavan, Maharashtra President and Newly Elected National Vice-president

यंदा राष्ट्रीय कौन्सिल मध्ये महाराष्ट्राला एकूण ३ जागा मिळालेल्या असून राज्यसचिव कॉम्रेड सागर दुर्योधन यांची याप्रसंगी राष्ट्रीय कौन्सिलवर निवड करण्यात आली.

यावेळी पुन्हा महाराष्ट्र राज्याध्यक्ष कॉम्रेड पंकज चव्हाण यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली असून एआयएसएफ महाराष्ट्र राज्य कौन्सिलसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे, महाराष्ट्रातील संघटनात्मक कार्याची ही पावती म्हणून बघण्यास हरकत नाही.